

नागपूर - राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर दोन्ही बाजूने राजकारण पेटले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणे यांना नोटीस देण्याची भाषा करीत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत असल्याचा आरोप केला. याबाबतीत प्यारे खान असे बोलतात, पण माझ्यासमोर आले की हात जोडून उभे राहतात, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला यावर प्यारे खान यांनी आज गुरुवारी हात जोडून नमस्कार हे आमचे संस्कार असल्याचे प्रत्युत्तर दिले.
नागपुरात आज प्यारे खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राणे यांनी म्हटले की, मी त्यांना हात जोडून नमस्कार करतो. हे खरे आहे. कारण कुणीही समोर आले की त्यांना हात जोडून नमस्कार करणे, हे आमचे संस्कारच आहेत. मित्रांना भेटल्यावर आपण असे करतोच. त्यातल्या त्यात मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहतो. त्यामुळे मी संस्कारीच आहे. मुळात मी चिडलो यासाठी की नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतात. आम्हाला त्यांच्या सल्ल्याची मुळीच गरज नाही. राज्यात महायुती सरकार आहे, जे येथे राहतात, त्यांनी कायद्याचे पालन करावे आणि केवळ मुस्लीम समाजाचेच लोक नॉनव्हेज खातात असे नाही, तर सगळ्याच समाजाचे लोक नॉनव्हेज खातात. त्यामुळे नितेश राणे यांनी जरा अभ्यास करून बोलावं, असा सबुरीचा सल्ला प्यारे खान यांनी दिला.
इस्लामचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. इस्लाममध्ये कधीही कुणावर जबरदस्ती केली जात नाही. व्हर्च्युअल ईद साजरी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र कुणावर दबाव टाकणे योग्य नाही. काय करायचे, ते मुस्लीम धर्मीय जाणतात. आमच्या समाजाच्या पद्धती काय आहेत, ते आम्हाला माहिती आहे. हे त्यांनी सांगायची गरज नाही. कधी कोणत्याही मुस्लीमाने होळी किंवा दिवाळीबाबत काही बोलले असेल तर सांगा. मुस्लीमांनी कधीही कुणाच्या सणांवर टीका टिप्पणी केली नाही, असेही प्यारे खान यांनी आवर्जून सांगितले.