

Minister Nitesh Rane Issue on Pyare Khan
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने महाराष्ट्र पुढे नेण्याच्या भूमिकेतून अविरत काम करीत असताना मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे सारखे नेते त्यांच्या कामांवर पाणी फेरत आहेत. मुस्लिम समाजाचा अनादर करणारी, सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. याविरोधात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मंगळवारी (दि.३) माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध जाती धर्मांना जोडण्याचे महाराष्ट्राचा विकास करण्याचे महाराष्ट्र घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांची महाराष्ट्रातच नाही तर देशभरात वेगळी ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफी कॉरिडॉरचे काम हाती घेत या देशाच्या एकात्मतेचा परिचय करून दिला.
मात्र, भाजपमधील नितेश राणे सारख्या व्यक्ती या भाजपच्या मोदी, फडणवीस सरकारच्या भूमिकेला धक्का लावत आहेत. ती भाजपची नव्हे त्यांची स्वतःची भूमिका असू शकते. यापूर्वी देखील भाजपने अशाच काही बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना बाजूला केले आहे. यामुळे आता नितेश राणे यांच्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच कारवाई करतील, असा विश्वास प्यारे खान यांनी बोलून दाखविला.