

Nitesh Rane On Bakri Eid
नागपूर - मंत्री नितेश राणे यांनी बकरी ईद संदर्भात वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लीम बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.अलंपसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणेंना नोटीस देण्याची तयारी चालवली पण नितेश राणे आपल्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहेत. हिंदुधर्मीय विविध सण साजरे करतात त्याप्रमाणे ईद देखील इको फ्रेंडलीच झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
नागपुरात दोन्ही बाजूने प्रतिक्रीया उमटल्या. राणे म्हणाले, जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी करा. फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात, तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. दुसऱ्या धर्मांना नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लीमांनीदेखील करावा, अशी माझी भूमिका आहे.
जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका बजावली पाहिजे, असे मी मानतो. खरे तर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्यारे खान यांनी मुस्लीम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित करून याबाबत त्यांचे प्रबोधन करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण सध्या प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे. ज्याप्रमाणे हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचे ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही. त्याचप्रमाणे मुस्लीमांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी, हा माझा सल्ला आहे. यामध्ये हिंदू - मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही नितेश राणे म्हणाले.
बकरी ईदमुळे हिंदू अस्वस्थ आहेत. कारण त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरे कापले जाणार. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार. उद्या त्यामुळे दंगली पण होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी कुणी सल्ला दिला तर तो ऐकला पाहिजे. हिंदू समाजाला सल्ले दिले जातात, तेव्हा हिंदू समाज आक्रोश करतो का? जोर जबरदस्ती करतो का? इस्लामला कोण बदनाम करत आहे आणि फडणवीस यांची बदनामी कोण करत आहे, हे महाराष्ट्राला कळत आहे यावरही अबू आझमी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत भर दिला.