

नागपूर: मुंबईसह इतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महायुती म्हणूनच आम्ही लढणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज (दि.१२ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपण स्वत: अशी आमची संयुक्त बैठक झाली. तसेच, भाजपाच्या कोअर कमिटीची ही बैठक झाली. महानगरपालिका निवडणूका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु जिल्हा परिषद निवडणूकामधील आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणूका कदाचित लाबंणीवर जाण्याची शक्यता आहे.
या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीमध्ये लढताना आगामी रणनिती आखण्याच्या दृष्टीने काही पध्दती विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती. मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये महायुती व्हायला हवी अशा अपेक्षा या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली. त्यानुसार सर्व महानगरपालिका निवडणूकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करुन युतीचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही रविंद्र चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महापालिका निवडणूकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करुन पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल व आगामी निवडणूका या महायुती म्हणून सकारात्मकरित्या लढण्याचा विचार व्यक्त करण्यात आला. बहुतेक ठिकाणी महायुतीमध्येच निवडणूका लढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार काल रात्री आमची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली.
सर्व निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते वेळोवेळी निर्णय घेतील त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणूकांमधील जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस, आरपीआय आणि अन्य घटकपक्षांचाही समावेश आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.