

सांगली : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिल्याची बातमी मतदान सुरू असतानाच येऊन धडकली आणि उमेदवारांच्या छातीतली धडधड वाढली. नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी 41, तर नगरसेवकपदाच्या 180 जागांसाठी 590 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे एकूण 631 उमेदवारांची अवस्था आता व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखी झाली आहे.
नगरसेवकपदांसाठी सारे राजकारण पेटले असताना आणि गेला महिनाभर त्याच दबावाखाली असताना आता निकालही पुढे गेल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले आहे. काय का लागेना; पण लगेच उद्या निकाल लागला असता तर सुटलो असतो, अशी चर्चा उमेदवारांमधून सुरू झाली.
जिल्ह्यातील उरूण ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा, तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. सोमवारी रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मंगळवारी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. सोमवारी आठही पालिकांमध्ये अत्यंत चुरशीने, तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले.
आज, बुधवारी मतमोजणी होणार होती. मात्र, मंगळवारी सकाळी 11 वाजताच उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे निवडणुकीसाठी उभारलेल्या उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा तणाव वाढला आहे. आता त्यांना वीस दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आठही पालिकांमधील मतमोजणी आता 21 डिसेंबररोजी संबंधित ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आता ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमभोवती वीस दिवस चोवीस तास चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.