

नागपूर : राज्य सरकार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे जोखीम घेवून काम करणाऱ्या महावितरणच्या कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तमोत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मूळ वेतनात १९ टक्के वाढ, ५ लाखांचा मेडिक्लेम, ६० वर्ष रोजगाराच्या हमीसह महत्वाच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती खापरखेडा व कोराडी यांच्यावतीने दहेगाव येथील रामदरबार मंदिर परिसरात गुरुवारी सायंकाळी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सर्वश्री मल्लीकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष चंद्रदास भालादरे, संयोजक नचिकेत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कंत्राटी कामगारांना नियमित भरतीमध्ये १० गुण देण्याचा निर्णय, कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय, कंत्राटदाराच्या नावाच्या गेटपास ऐवजी कंत्राटी कामगारांच्या गेटपासवर महानिर्मिती व महावितरणचा शिक्का देण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून कंत्राटी व असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यात आली असून ३४ मंडळ तयार करण्यात आले आहेत. या मंडळांच्या माध्यमातून त्यांच्या हिताच्या योजना थेट पुरवून त्यांना सामाजिक स्थेर्य देण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असल्याचेही ते म्हणाले.
कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात पैसे देण्याचा निर्णय झाला. मात्र, काही ठिकाणी कंत्राटदार हे कामगारांचे एटीएम कार्ड स्वतः जवळ ठेवत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. लाडकी बहीण ही योजना बंद होवू देणार नाही. या योजनेसाठी दलित निधीचे पैसे वळविले नाही. या संदर्भातील आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषणकर्ते वीज निर्मिती कंत्राटी कामगार सतीश तायडे यांना गौरविण्यात आले.