

Maharashtra winter session
नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष अपेक्षित असताना महाविकास आघाडीच्या तंबूतच खुर्चीवरून वाद सुरू आहे. विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये खटके उडाले. हा वाद इतका वाढला की, काँग्रेस आमदारांनी थेट विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. यानंतर ठाकरे गटाच्या पुढच्या रांगेतील दोन जाग कमी करून काँग्रेसला देण्यात आल्या.
सभागृहातील पहिल्या काही रांगांमध्ये बसण्यासाठी दोन्ही गटांमध्ये वाद झाला. सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या २० आमदारांपैकी १४ आमदारांना पुढील रांगेत बसण्याची व्यवस्था आहे. तुलनेत काँग्रेसच्या १६ आमदारांपैकी फक्त ४ आमदारांना पुढे जागा दिली आहे. यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या नवीन आमदारांच्या मागे बसावे लागत होते.
यामुळे दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये वाद होता. याबाबत ठाकरे गटाला बाजुला ठेवत काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. संख्याबळ व ज्येष्ठतेनुसार काँग्रेसने पुढील जागांवर दावा केला. तर प्रथा परंपरेप्रमाणे ठाकरे गटाने पुढील जागांवर दावा केला होता. अखेर ठाकरे गटाला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या पुढील दोन जागा कमी करत काँग्रेसला देण्यात आल्या. पुढे बसण्यावरून काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यामुळे ठाकरे गटात नाराजी आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या तीन दिवसात पायऱ्यांवर केवळ एकदा आंदोलन झाले. आज तिसऱ्या दिवशी विरोधकांना आंदोलनाचा विसरच पडला. विरोधी पक्षनेता नसल्याने जबाबदारी कोणी घ्यायची, यावरून संभ्रम असल्याचे बोलले जात आहे.