

Maharashtra Politics News
नागपूर : महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंगच होती, या निवडणुकीत नेमके काय झाले? हे सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले. दम असेल तर यावर खुलासा करावा असा दावा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना आव्हान देत 2009 च्या निवडणुकीतील आकडेवारी दिली. यावर वडेट्टीवार यांनी पलटवार केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली संख्या आणि महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यावर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत लेखातून भूमिका मांडली आहे.
मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच सदोष आहे. त्यानंतर विविध यंत्रणांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकली, असा आरोप विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला. मतदानाची वेळ संपल्यावर २०२४ विधानसभा निवडणुकीत साडेआठ टक्के सरासरीने मतदानाची टक्केवारी वाढते हे संशयास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बेईमान पद्धतीने सरकार आलेले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे, यावर संबंधितांनी खुलासा केला पाहिजे.
राज्यात सारथी, बार्टी, महाज्योती यांना समान निधी वाटप केल्याचा दावा सरकार करत असले तरी सारथीला इमारत आणि हॉस्टेल बांधण्यासाठी अधिकचा निधी दिला आहे. इतर संस्थांना कमी निधी दिला आहे. महाराष्ट्राची तिजोरी ही ओबीसी समाजासाठी नाही का? निवडणुकीत भाजप ओबीसी समाजाची मत घेते आणि सरकार आल्यावर मात्र दुर्लक्ष करतात? हा अन्याय आहे. सरकारने सर्वांना समान निधी आणि न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.
राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे वडेट्टीवार म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येण्याची भीती सत्ताधाऱ्यांना का वाटते? त्यांच्या युतीच्या बातम्यांनी सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.