

नागपूर: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे वाटेकरी झालेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मात्र आता परस्परांविरुद्ध उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसत आहेत. (Maharashtra Politics)
देशपातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी मध्ये देखील फाटाफूट सुरू आहे. महाराष्ट्रात एकीकडे भक्कम बहुमतातील भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतरही रोज राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. खासदार फोडण्याच्या दृष्टीने भाजपात ऑपरेशन लोटसची चर्चा जोरात आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला (Mahavikas Aghadi) मोठे खिंडार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभवानंतरही काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असा सबुरीचा सल्ला दिल्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.
माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये प्लॅनिंगमध्येच अधिक वेळ गेला. प्रत्यक्षात काम कमी झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय राऊत यांच्यातील जागा वाटपावरून त्यांनी ठपका ठेवला. अप्रत्यक्षपणे हे षड्यंत्र होते का ? असा हल्ला चढविला. 28 दिवस केवळ चर्चा, वाटाघाटीतच आम्ही गुंतलो, असा आरोप करीत महाविकास आघाडीत एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. शुक्रवारीवारी ते चंद्रपूरला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पक्षाचे बघावे, आम्हाला उगीच सल्ला देऊ नये, असे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर होणार अशी एकंदरीत चिन्हे आहेत. (Mahavikas Aghadi)
दरम्यान, काँग्रेसचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी देखील काँग्रेस महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. राजकीयदृष्ट्या आम्ही परस्परांमध्ये कुरघोडी करण्यात गुंतलो होतो. संघटनात्मक बाबतीत आम्ही लक्षच दिले नाही. केवळ वाटाघाटीत वेळ वाया गेला. विधानसभा निवडणूक आम्ही गांभीर्याने घेतली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या वादातच अधिकाधिक वेळ गेला. संघटनात्मक दृष्ट्या कमी पडलो असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाचे संकेत दिले. (Mahavikas Aghadi)
मात्र, या संदर्भात प्रस्ताव पक्षाकडे दिला गेला असला तरी हायकमांड अंतिम निर्णय घेईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. एकंदरीत लोकसभेला राज्यात भाजपला धोबीपछाड देणाऱ्या महाविकास आघाडीत आता विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. अनेक जण विकासाचे नाव घेत सत्तेच्या बाजूने जाण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.