

मुंबई : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी आता स्वबळाचा सूर आळवला आहे. राज्यभरात विधानसभेच्या सर्व मतदारसंघांत पक्षाची ताकद वाढवून तेथे आगामी निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे लढायला हवे, अशी मागणीच या उमेदवारांनी केल्याने पराभवानंतर महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे गट महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभेला ठाकरे गटाच्या 95 उमेदवारांपैकी केवळ 20 उमेदवार विजयी झाले. यातील 75 पराभूत उमेदवारांनी बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन ईव्हीएमविरोधात नाराजीचा सूर लावला. तसेच, राज्यभरात पक्षाची ताकद वाढवून आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा नारा दिला. याबाबत पक्षाने भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे गटाचे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतंत्र लढण्याबाबत कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या मागणीचे समर्थन करीत अजूनही यासंदर्भात पक्षाकडून कोणताच निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, स्वबळाचा नारा कोणी दिलेला नाही; मात्र पक्षाने 288 विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद निर्माण करावी आणि येणार्या काळात ताकदीने तेथे निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका काहींनी मांडली आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. मात्र, आघाडी असतानाही 288 मतदारसंघांत आमचा पक्ष मजबूत व्हावा, याबाबत आम्ही अनुकूल आहोत.
लोकसभेत आम्ही सर्व एकत्र लढलो. आम्ही सर्वांनी जागा जिंकल्या. आता विधानसभेत गणिते बदलल्याने कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत. एवढा दारुण पराभव होईल, असे कोणीही गृहीत धरले नव्हते. त्यामुळे सर्वांची मते, म्हणणे ऐकून घेणे हे पक्षनेतृत्वाचे, संघटनेचे काम असते. पुढील वाटचाल कशी करायची ते चर्चेनंतर ठरविले जाईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गट हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना आघाडीत राहायचे की वेगळी चूल थाटायचीहा त्यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
स्वबळावर लढायची जशी त्यांची इच्छा होती, तशी आमच्यापैकीही काहींची तशी इच्छा होती. ते पक्षाचे मत असू शकत नाही. आम्ही आलेल्या निकालांचे विश्लेषण करू. याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलून आम्ही आमची पुढील भूमिका घेऊ, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.