

Chandrashekhar Bawankule on Farmer ID
नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे दोन महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. १ जानेवारी २०१५ पूर्वी शेतजमीन कसत असल्याचा कोणताही एक पुरावा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, दिवाळीच्या निमित्ताने सरकारने शेतकऱ्यांना ही मोठी भेट दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील अनेक भागांमध्ये आदिवासी बांधवांसह अनेक शेतकरी वर्षानुवर्षे जमिनी कसत आहेत. मात्र, त्यांच्या नावावर जमिनीचे पट्टे नाहीत. त्यामुळे त्यांचा विविध शासकीय योजनांमध्ये समावेश होत नाही. काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे फार्मर आयडीदेखील तयार झालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने विशेष प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे.
१ जानेवारी २०१५ पूर्वी संबंधित जमीन कसत असल्याचा एकही पुरावा उपलब्ध असल्यास अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार आहे. हस्तलिखित महसुली नोंदी, उपलब्ध अधिकार अभिलेख आणि इतर पुराव्यांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जाईल. जमीन सरकारी असली तरी संबंधित शेतकरी ती कसत असल्याचा पुरावा असल्यास त्याला फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. पीक पाहणीची प्रक्रिया ऑनलाइन करताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पीक पाहणी रखडली होती. ही अडचण दूर करण्यासाठी आता ऑफलाइन पीक पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पीक पाहणीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही लोहारी सावंगा गावात मुक्कामी जाणार आहोत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला उद्या चालना देऊन त्याची भेट शेतकऱ्यांना देणार आहोत. मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करणार असल्याने यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी निश्चितच गोड ठरेल, असे बावनकुळे म्हणाले.