

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. नागपूरचे वातावरण थंड असले तरी दुसरीकडे नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईसाठी, खवय्यांच्या सेवेसाठी आमदार निवासातील कँटीन रविवारी ७ डिसेंबरपासून सज्ज झाले आहे. आमदार, त्यांचे पीए, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंदोबस्तातील पोलिस अशा दररोज तब्बल ३ हजारांहून अधिक लोकांची भूक भागवणाऱ्या या कँटीनमध्ये या वर्षीही खाद्यसामग्रीचा 'मेगा स्टॉक' सज्ज ठेवण्यात आला आहे. या कँटीनमध्ये रोज लागणारा साहित्याचा आकडा चकित करणारा आहे.
दोन्ही बेत
शाकाहारी - मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ येथे उपलब्ध असून, दुपार व रात्रीच्या जेवणाबरोबरच सकाळ-संध्याकाळ नाश्त्याचीही उत्तम सोय आहे. शाकाहारी जेवणाच्या मेजवानीत वांग्याचे भरीत, पालक पनीर, लसूण मेथी, झुणका, मिक्स व्हेज, डाळ तडका, पोळी, भाकरी, भात आणि सॅलड -असा तृप्त करणारा मेन्यू रोजच्या जेवणात असणार आहे.
दुसरीकडे नाश्त्यात दक्षिणेचा स्वाद, सोबत पोहा ऑम्लेट सकाळी ६ ते ११, दुपारी ४ ते ७ या वेळात उपलब्ध आहे. मेन्यूमध्ये इडली, डोसा, उत्तपम, उपमा, चना-रसा, आलू पोहा आणि ऑम्लेट-ब्रेड-बटर अशी वैविध्यपूर्ण लज्जतदार पदार्थांची रेलचेल असणार आहे.
पोलिस तपासणीनंतरच प्रवेश
आमदार निवास परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांची कडक नजर आहे. हिवाळी अधिवेशना निमित्त कँटीनमध्ये स्वयंपाक, सर्व्हिस, स्वच्छता आणि एकूण व्यवस्थापन अशा सर्व कामांसाठी सुमारे ४०० कर्मचारी सज्ज असल्याचे कँटीनचे संचालक तपन डे यांनी सांगितले.