

नागपूर : विरोधी पक्षनेतेपद देण्याचा अधिकार सरकारचा नाही तर विधानसभा अध्यक्ष आणि सभापती या संदर्भात निर्णय घेतील मात्र लोकशाहीवर बोलण्याचा विरोधकांना अधिकार नाही. कारण त्यांचा संवैधानिक संस्थावर विश्वास नाही या रोखठोक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना सुनावले.
विरोधकांनी परंपरागत बहिष्कार आज कायम ठेवला. आमचा चहा आम्हीच घेतला. विरोधकांची निराश मनस्थिती दिसली. त्रागा करणारी पत्र परिषद घेतली. विरोधकांनी पाठविलेल्या पत्रावर शरद पवार गटाची स्वाक्षरीही नाही अशी टोलेबाजी केली. अजित पवार आज रात्रीपर्यंत नागपुरात पोहोचत आहेत उपस्थित नसल्याने गैरसमज नसावा अशी पुस्ती जोडली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 2014 पूर्वीचा विदर्भ आणि आजचा विदर्भ किंबहुना त्यांच्याच शेजारी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा जरी विकास बघितला तरी त्यांच्या फरक लक्षात येईल. आर्थिक अडचणी असल्या तरी राज्य कुठे दिवाळखोरीकडे नाही. कुठल्याही योजनेसाठी पैशांची अडचण नाही असा दावा केला. विरोधक अभ्यास न करता बोलत आहेत सर्व प्रश्नांवर चर्चेला आम्ही तयार आहोत. आचारसंहितेच्या अडचणीमुळे पूर्णवेळ अधिवेशन घेऊ शकत नाही परंतु सरकार पळून जाणार नाही असे ठणकावले.
विरोधी पक्षनेते पद संदर्भात अध्यक्ष, सभापती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आमचा कुठलाही दुराग्रह नाही. या हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. एकंदर 18 विधेयके मांडली जाणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कर्जमुक्ती संदर्भात परदेशी समिती नेमली असून पात्र शेतकऱ्यांना ती दिली जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.
लाडक्या बहीणींना 2100 रुपये योग्य वेळी
लाडकी बहीण 2100 रुपये योग्य वेळी योग्य निर्णय दरम्यान, शिवभोजन योजना सुरू आहे त्या बंद होणार नाहीत. निवडणुकीपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमुक्तीच्या दृष्टीने पुरेशी तरतूद केलेली आहे आणि नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू असल्याचे सांगितले. नगरपरिषद निवडणुकीत पराभवाच्या भीतीपोटी विरोधक कार्यकर्त्यांना विसरले . आम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले नाही. यातूनच अनेक जागी स्वतंत्र लढलो अशी कबुली दिली.