

नागपूर : लोकसभेत गेल्यावेळी विरोधी पक्षनेतेपद मिळाले नव्हते; मात्र यंदा पुरेशा संख्याबळामुळे ते मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेतही विरोधकांनी स्वतःचे संख्याबळ वाढवून पुढील वेळेस विरोधी पक्षनेतेपद मिळवावे, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ‘रामगिरी’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “विरोधक आज सरकारवर संवैधानिक पद्धतीने न वागण्याचा आरोप करतात. त्यांच्या काळातही संख्याबळ कमी असताना भाजपला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले, असा दावा ते करतात. पण विरोधक आजही बहिष्काराचा प्रोटोकॉल पाळतात. सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी पायऱ्यांवर बसून फोटोसेशन करण्यात त्यांना जास्त रस आहे.”
ते पुढे म्हणाले, “संख्याबळ कमी असले तरी सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार आहे. आमचा अजेंडा खुर्चीसाठी नाही, तर लोकसेवेसाठी आहे. आम्ही डे-नाइट काम करतो; घरी बसत नाही. घटनाबाह्य उपमुख्यमंत्री म्हणणाऱ्यांनी त्यांच्या काळात काय केले हे त्यांनीच स्पष्ट करावे. त्यांना जळी-स्थळी-पाषाणी मीच दिसतो.”
फडणवीस यांच्यावर सुरू असलेल्या ‘शिंदे–फडणवीस विसंवाद’ चर्चेलाही शिंदे यांनी उत्तर दिले. “आम्ही एकत्र आहोत. रोज एकमेकांना फोन करून संभाषणाचे फोटो इंस्टाग्रामवर टाकायचे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले, “विरोधकांनी सकारात्मक टीका करावी आणि आत्मचिंतन करावे. प्रश्न सोडवायचे असतील तर अधिवेशनात पूर्ण वेळ बसा असे ते म्हणाले.