

नागपूर : मध्यप्रदेशातील पचमढी येथील मोठा महादेव गडावर श्री महाशिवरात्री निमित्ताने (Maha Shivratri 2025) येत्या २६ फेब्रुवारीरोजी यात्रा भरणार आहे. सोमवारपासून (दि. १७) ही यात्रा सुरू झाली आहे. यावर्षी किमान १५ लाख भाविकांची गर्दी होईल, असा अंदाज आहे. नागपुरातून मोठा महादेव येथे जाणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. विदर्भ आणि मध्य भारतातून भाविक येथे येतात. नागपूरचा विचार करता किमान ८ लाख भाविक वेगवेगळ्या आकारातील त्रिशूल घेऊन महादेवाच्या दर्शनाला येतात.
महादेवा जातो गा... असे गाणे गात ही भगत मंडळी वेगवेगळ्या जागी मुक्काम करीत आनंदाने यात्रा करतात. मध्य प्रदेशातील दुर्गम जंगलातही काही स्वयंसेवी मंडळातर्फे जागोजागी लंगर लावण्यात येतात. स्वयंसेवक संस्था देखील कार्यरत असतात. श्री महादेव तथा श्री नागद्वार यात्रा पचमढी बचाव कृती समितीच्या प्रतिनिधींची या संदर्भात बैठक झाली. (Maha Shivratri 2025)
सुविधांचा आढावा घेण्यात आला. नागपुरातील भारतमाता चौक परिसरात हे त्रिशूल तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय अनेक वर्ष सुरू आहे. या ठिकाणी छोट्यापासून मोठ्यात मोठ्यात त्रिशूलाची निर्मिती सहा महिन्यांपासून केली जाते. आधी ही यात्रा अतिशय अवघड मानली जात असल्याने जड अंतकरणाने निरोप देण्यासाठी महादेवाला जाणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी होत होती. मात्र, आता प्रशासन व स्वयंसेवी संस्थांतर्फे विविध सुविधा झाल्याने ही यात्रा अधिक सुकर झाली आहे.
यासोबतच नागपुरातील मोक्षधाम, नगरदेवता श्री जागृतेश्वर, कल्याणेश्वर, पाताळेश्र्वर, नागेश्वर, चिंतेश्वर जिल्ह्यातील पाच नद्यांच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र अंभोरा येथील चैतन्येश्वर, केळवदचे श्री कपिलेश्वर , घोगरा महादेव, काटोल पारडसिंगा येथील चिंतामुनीश्वर टेकडी, वर्धा जिल्ह्यातील ढगा महादेव, वरूड मोर्शी परिसरातील सालबरडी येथील छोटा महादेव या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक गर्दी करतात. विशेष बस, सुरक्षा व्यवस्थेसाठी राज्य परिवहन महामंडळ, पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.