

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी व जलदगतीने पोहचविण्यासाठी केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील ५ लाख ९ हजार ४३५ शेतकऱ्यांना फार्मर आयडी (शेतकऱ्यांचा विशेष ओळख क्रमांक) प्रदान करण्यात आले आहेत. (Nagpur News)
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी या युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. नावावर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक उपक्रमातंर्गत आपली शेतजमीन आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्रीस्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.
राज्यात १६ डिसेंबर २०२४ पासून या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून देण्यास सुरुवात झाली आहे. यानुसार आतापर्यंत राज्यात ४२ लाख ६८ हजार १९ शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्रदान करण्यात आला असून नागपूर विभागातील ५ लाख ९ हजार ४३५ शेतकऱ्यांना युआयडी देण्यात आला आहे. विभागात गोदिंया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १० हजार ६८४ शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्रदान करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ९९ हजार ४५५, वर्धा जिल्ह्यात ७५ हजार २३३, नागपूर जिल्ह्यात ७४ हजार ८५६, भंडारा जिल्हयात ७९ हजार ६०८ तर गडचिरोली जिल्ह्यात ६९ हजार ५९९ शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्रदान करण्यात आला आहे.
फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतजमिनींचे जिओ रेफ्रन्सिग (भू-संदर्भीकरण) होणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होऊन संपूर्ण माहिती एकत्र केली जाणार आहे. शेतीविषयक योजनेचा अर्ज भरतांना यामुळे मदत होणार आहे.