

Chandrashekhar Bawankule on Maharashtra Local Body Elections
नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर पर्यंत होण्याची शक्यता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा तिन्ही संस्था एकत्र काम केल्यास परिसराचे चित्र बदलते. मात्र, गेल्या काही दिवसात निवडणुका न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जी आता या निवडणुकीनंतर दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीसाठी भाजप महायुती सज्ज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतल्यास ऑक्टोबरपर्यंत निवडणूक घेतल्या पाहिजेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेत आवश्यक संसाधने राज्य सरकारला उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 13 हजार लोकप्रतिनिधी पदे रिक्त आहेत. महापालिका, जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती, आदींच्या निवडणुकीत नवीन नेतृत्व तयार होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, महायुतीत राजी नाराजी असली तरी सर्व काही ऑलवेल ठेवण्याचे जबाबदारी आमची, अर्थात भाजपची अधिक आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पुढाकार घेण्याच प्रयत्न करीत आहे. पालकमंत्री पदाचा तिढा त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाकडून सुटावा, अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या संदर्भात जाहीर वाच्यता करण्याची गरज नाही, असा सबुरीचा सल्ला देखील त्यांनी मित्र पक्षांना दिला.