

नागपूर : भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानच्या विविध शहरात, पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा दिला. वायुदल, नौदल, सैन्यदलाच्या पाठीशी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश एकजुटीने उभा राहिला. मात्र आता या मुद्द्याचे राजकारण होताना दिसत आहे.
उत्साहाच्या भरात मंत्रिमंडळात दोन नंबरचे जबाबदार मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मोदीजींनी पाकिस्तानात शिरून नक्षलवादी मारले... !' असा बेजबाबदारपणे उल्लेख केला आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा नक्कीच चिंतेचा विषय ठरला आहे. एकीकडे मध्यप्रदेशातील एका मंत्र्याचे रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबतीतले बेजबाबदार विधान चर्चेत असताना बावनकुळे यांचा माध्यमांशी बोलताना' हे तर ट्रेलर झाले. पिक्चर अभी बाकी है...' म्हणताना तोल गेला.
काश्मीर पहलगाम येथील घटना, 26 भारतीयांचा दहशतवादी हल्ल्यात झालेला मृत्यू त्यानंतर भारतीय सैन्याने त्याचा वचपा काढत हाती घेतलेले ऑपरेशन सिंदूर. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता ठिकठिकाणी सिंदूर सन्मान, तिरंगा यात्रा काढण्याचे ठरविले आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील तिरंगा यात्रा आणि मोदी सरकारला प्रश्न विचारणारी जय हिंद सभा ठिकठिकाणी घेण्याचे ठरविले आहे. एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या ऐरणीचा ठरणार आहे.
नागपुरात बावनकुळे यांच्या मतदारसंघात त्यांच्याच नेतृत्वात कामठी येथे 16 मे रोजी तर नागपूर शहरात 18 मे रोजी ही तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. या एकंदरीत पार्श्वभूमीवर जबाबदार मंत्री असलेले महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री दहशतवाद्यांना असे बेजबाबदारपणे नक्षलवादी का बोलले...? हा मुद्दा सोशल मीडियावर सध्या बराच चर्चेत आला आहे, हे विशेष.