

Khasdar Sanskrutik Mahotsav 14 February
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्यात सकारात्मकता यावी, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी आयोजित या महोत्सवाचे यंदा हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, गीतकार समीर, गायक नितीन मुकेश, शिवा चौधरी, अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेते शेखर सेन, गायक अनुप जलोटा अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात आपली उपस्थिती लावली आहे.
यंदाचा हा महोत्सव 14 व 15 फेब्रुवारी दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता हिंदी व मराठी चित्रपटांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणारी व तीनदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील तर ज्येष्ठ नेते दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रानंतर संगीत अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा सुगम संगीतांचा कार्यक्रम होईल, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी, 15 तारखेला सकाळी 10.30 वाजता प्रसिद्ध कवी, गीतकार, संगीतकार जोडी सलील कुळकर्णी व संदीप खरे यांचा कार्यक्रम ‘आयुष्यावर बोलू काही’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्ती निशिगंधा वाड यांची उपस्थिती राहील.
याशिवाय, या दोन दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व समाजाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणा-या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असला तरी पासेस अनिवार्य राहतील. या नि:शुल्क पासेस सुरेश भट सभागृह तसेच, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्यालय आणि नितीन गडकरी यांचे खामला येथील जनसंपर्क कार्यालय येथून दुपारी 12 ते 4 यावेळात प्राप्त करता येतील.
पत्रकार परिषदेला सचिव डॉ. राजू मिश्रा, अशोक मानकर, डॉ. संजय उगेमुगे, प्रा. अनिल सोले, अविनाश घुशे, नारायण समर्थ, प्रभाकर येवले यांची उपस्थिती होती.