

Nagpur Tamil community
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ते परिवारासाठी नाही तर सर्व समाजासाठी लढले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तिरुवन्नामलाई येथील मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. महाराष्ट्रीयन असो, तमिळ असो, कन्नड असो अथवा अन्य प्रांतीय, आपण प्रत्येकजण आपल्या प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मितेसाठी अधिक कटिबद्ध आहोत, ही आपली शक्ती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
राजभवन नागपूर येथील दरबार हॉलमध्ये तमिळ बांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, सेंथिल कुमार, के जगदिसन, श्रीमती रीमा मोहन, अतुल मोघे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांनी गौरव केला.
आर.रामकृष्णन व श्रीमती प्रीती रामकृष्णन लिखित “भारतीय ज्ञान परंपरा” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. आपल्या वेदांमध्ये दडलेले ज्ञानभंडार डिजिटल स्वरूपात जतन केले असून या पुस्तकाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देताना मला आनंद होत असल्याची भावना आर रामकृष्णन यांनी व्यक्त केली.
विविधतेतून प्रगल्भता साधत तामिळ बांधवांनी आज सर्व क्षेत्रात यश साध्य केले असे अतुल मोघे म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात अरुणा विजयाकुमार यांच्या गायनाने झाली. प्रतिभा नृत्य मंदिरच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम सादर केले. बँक ऑफ इंडियाचे निवृत्त मुख्य व्यवस्थापक तथा कांचि कामकोठी पिठाचे को-कन्वेनर जी.चंद्रशेखरन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नागपूर मुक्कामी असताना राजभवन येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा सन्मान केला. यावेळी सचिव प्रशांत नारनवरे, एडीसी अभयसिंह देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.