

Uddhav Thackeray on Amit Shah
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. शहा यांचा मुलगा पाकिस्तानशी क्रिकेट खेळतो. पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले किरण रिजेजू यांनी स्वतः आपण गोमांस खातो, असे सांगितले होते. इकडे शहा त्यांना सोबत घेऊन बसतात. त्यामुळे आता त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी (दि.११) केली.
अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित केली होती. आज हिवाळी अधिवेशन निमित्ताने ठाकरे विधान भवन परिसरात आल्यानंतर या संदर्भात त्यांनी संघ, भाजप आणि अमित शहा यांनी हिंदुत्व शिकवू नये, असे प्रत्युत्तर दिले.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्राचे गीत वंदे मातरम् वर चर्चा कशी होऊ शकते. मुळात संधीसाधू भाजपसाठी ते वन डे मातरम् आहे. देशरूपी माता किती संकटात आहे, त्याच्याशी त्यांना घेणेदेणे नाही. संघाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मुस्लिम लीगचे काय संबंध होते, हे यानिमित्ताने पुढे आले आहे.
संघाच्या कार्यालयासाठी आज मंदिर पाडले जाते. मी मुख्यमंत्री असताना पालघर येथील साधूंच्या हत्याकांडवरून मला बदनाम केले. आज भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षात घेतले. हे अमित शहा यांना चालते का, मुंबई घशात घालण्याचा, गुजराती मराठी वाद पेटविण्याचा त्यांचा डाव असून तो आम्ही हाणून पाडू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.