

नागपूर : नागपुरातील पूर्व नागपूरच्या दाट वस्ती असलेल्या पारडी क्षेत्रातील शिवनगर परिसरातील काजल बीअर बारजवळ एका घरात आज बुधवारी सकाळी बिबट्या थेट वरच्या माळ्यावर शिरल्याने नागरिक सुमारे चार तास चांगलेच दहशतीत होते. वन विभाग, रेस्क्यू टीममार्फत अखेर तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. त्यापूर्वी सात लोकांना या बिबट्याने जखमी केले.
घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. माहिती मिळताच वन विभाग, कलमना पोलिस आणि पिंजर्यासह रेस्क्यू टीम दाखल झाली. यापूर्वी मनपाच्या 5 नंबर नाक्याजवळ सोमवारी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिक दहशतीत होते. आज झाडीझुडपात दडी मारून बसलेल्या या बिबट्याने थेट घरावर ताबा मिळविला. दुसर्या माळ्यावर एका बिबट्याने बस्तान मांडले होते. सुमारे तीन ते चार तास झुंज देत अखेर वन विभाग, पोलिस आणि रेस्क्यू टीमने या बिबट्याला पिंजर्यात जेरबंद केले आणि नंतर त्याला अधिवासात मुक्त केले.