

Devendra Fadnavis on Raj Thackeray
नागपूर : कुठल्याही प्रकल्पाला विरोध केला तर अटक केली जाईल, असे सांगितले जाते. असे असेल तर एकदा अटक करून दाखवाच, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यात बोलताना राज्य सरकारला दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''त्यांच्याकरिता कायदा बनलाच नाही, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही तर तुमची अटक करण्याचे कारण नाही,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
जे लोक कायद्याच्या विरोधात आहेत त्यांच्याकरिता तो कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे कमेंट्स आहेत ते कायदा न वाचता केलेले कमेंट्स आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
माझं अतिशय पक्क मत आहे. महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे. ती अनिवार्य असली पाहिजे. ती अनिवार्य आपण केलीच आहे. पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेच्या पायघड्या घालायच्या त्या मानसिकतेला माझा विरोध आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल? याचा विचार करत आहेत. पण जे काम धांद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कसे येईल? याचा विचार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही गुजरातचे आहेत. अमित शाह म्हणतात की मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. प्रत्येक नेत्याला आपल्या राज्याचे प्रेम असते. पण आपल्या नेते संकुचित आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.