

पुणे: "सरळ काम तर सगळेच करतात, पण जे वाकडं काम परत सरळ करतात, त्यांचीच माणसं नोंद ठेवतात," असा अजब सल्ला राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महसूल दिनाचे औचित्य साधून इंदापूर तहसील कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, "एखादं काम नियमात बसत नसेल, तरी त्याला नियमात बसवून कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. सरळ काम तर कुणीही करतं, पण वाकडं काम सरळ करणाऱ्या अधिकाऱ्याला लोक लक्षात ठेवतात." त्यांच्या या विधानानंतर सभागृहात उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये काही क्षणांसाठी शांतता पसरली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. एका बाजूला पारदर्शक आणि नियमानुसार कारभाराचे धडे दिले जात असताना, मंत्र्यांनीच 'वाकडं काम' करण्याची दिलेली संधी अनेकांना चक्रावून गेली.
दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचे दोन अर्थ काढले जात आहेत. यामध्ये काही जणांच्या मते, भरणे यांचा उद्देश किचकट आणि प्रलंबित प्रकरणे नियमांच्या चौकटीत राहून, नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवावीत, असा असू शकतो, असा सकारात्मक अर्थ काढला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, 'वाकडं काम' या शब्दप्रयोगामुळे नियमांना बगल देऊन किंवा आर्थिक तडजोड करून कामे करण्याला प्रोत्साहन मिळत असल्याचा नकारात्मक अर्थ देखील निघतो, जो अधिक धोकादायक आहे. महसूल विभाग हा थेट जनतेशी संबंधित असून अनेकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असतो. अशा परिस्थितीत खुद्द मंत्र्यांकडून आलेला हा सल्ला प्रशासकीय पारदर्शकतेच्या धोरणाला छेद देणारा असल्याची टीका होऊ लागली आहे.
कृषिमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हे विधान अडचणीचे ठरू शकते. एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची कामे वेळेत मार्गी लावण्याचे आणि सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या 'अजब' सल्ल्यामुळे त्यांच्या मूळ भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वक्तव्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता असून, विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता दत्तात्रय भरणे आपल्या विधानावर स्पष्टीकरण देतात की ही त्यांची प्रशासकीय कामाची नवी शैली आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.