Nitesh Rane on Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खानच मोठा हिंदू!" नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य, राज ठाकरेंनाही टोला
मुंबई : "अभिनेता सलमान खान हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदू आहे. उद्धव ठाकरे हिंदू आहेत का, हे तपासून बघावं लागेल. सलमानने संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली," अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संघाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहिले असते तर त्यांनाही योग्य दिशा मिळाली असती, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
मंत्री राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले, आता एक नंबरवर राहण्याची आम्हाला सवय झाली आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत फेव्हिकॉल का जोड महायुतीचा झालाय. कोकण हा भाजप आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. सिंधुदुर्गात उबाठाला फक्त औषधाला ठेवलंय. जनतेनं विश्वास दाखवला आहे, जनतेनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यात कृतीतून आता पूर्ण करु. हिंदुत्व विरोधी राजकारणाला जनतेनं ठोकर मारली आहे, असे नितेश राणे म्हणाले.
नुकताच राष्ट्रीय स्वंयम सेवक संघाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवडूमधील अनेक कलाकार उपस्थित होते. सलमान खान पासून रणबीर कपूर अन् विकी कौशल देखील उपस्थित होता. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. "संघाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, भाषेच्या बाबतीत विचार मांडले. याबाबत राज ठाकरेंना चुकीची माहिती मिळाली आहे. मुल्ला मौलवींवेळी गप्प बसायचं आणि हिंदू आणि हिंदुत्ववार बोलून पाकिस्तानातील अब्बांना खूश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," अशी टीका राणे यांनी केली.
"या कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली, तो उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू निघाला. राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना हिंदूहृदयसम्राट देखील बोलू शकत नाहीत. रटाळ प्रवचनात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली असती. रटाळ बोलण्यापेक्षा बैद्धिक घेतलं असतं तर इतकी लोकं सोडून गेली नसती," असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

