Raj Thackeray | सरकारला जाब विचारू नये म्हणून तरुणांना रील करमणुकीत गुंतवले : राज ठाकरे

महाराष्ट्र हितासाठी करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा!
Youth political awareness
सरकारला जाब विचारू नये म्हणून तरुणांना रील करमणुकीत गुंतवले : राज ठाकरेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : लोकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नयेत, जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरू नये यासाठी मोबाईल रील्स, आयपीएल, चित्रपटांच्या करमणुकीत गुंतवून ठेवण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी करमणुकीच्या या गटारगंगेतून बाहेर या. अन्यथा तुमच्या सभोवतालचे काय निघून गेले याचा थांगपत्ताही लागणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यात दिला.

उज्ज्वल महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ‌‘महाराष्ट्र पुढचा‌’ हे नवे संकेतस्थळ सुरू करत असल्याची घोषणा करत नागरिकांना यात आपले विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहनही राज यांनी केले. बारा वर्षांपूर्वी मांडलेल्या ब्लू-प्रिंटच्या प्रयोगानंतर आता या नव्या उपक्रमाची घोषणा झाली. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पुढचा या संकेतस्थळाची घोषणा केली. यात 27 विषय आणि त्यांचे विविध पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यावर नागरिकांनी पाठविलेल्या सूचनांचा तज्ज्ञ समिती अभ्यास करेल व त्या पुढे सरकारकडे दिल्या जातील. या काळातले वाहक म्हणून काम करू, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Youth political awareness
Mumbai construction pollution : मुंबईत बांधकामांच्या वेळेत कपात करा !

संतपरंपरा, तिहासिक व्यक्ती, मुंबईला आकार देणारे महत्वाची लोक, समाजसुधारक, क्रांतिकारक, अभ्यासक, इतिहासकार, खेळाडू, राजकीय नेते, प्रशासक, साहित्यिक, कलावंताचा यात समावेश होता. आपण केवळ जयंती आणि मिरवणुकीत अडकलो आहोत. मिरवणुका काढून, गुलाल उडवून आणि झेंडे नाचवून काही होणार नाही. प्रतिमेत अडकलेला महाराष्ट्र आपल्या महापुरूषांच्या प्रतिभेकडे वळला तरच गतवैभव मिळवू शकेल, असे राज ठाकरे म्हणाले. कोणता नवा विचार महाराष्ट्राकडून मिळतोय यासाठी अख्खा देश महाराष्ट्राकडे पहायचा, पण आता आपण करमणुकीच्या गटारगंगेत लोळतोय अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यावरील कर्जाच्या बोजा, सरकारवर निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणार असल्याचे म्हटले आहे. पण आज राज्यावर 11 लाख कोटींचे कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हा 2 लाख कोटींचे कर्ज होते. शहरे कोलमडून पडली आहेत. ग्रामीण भागातील युवक शेतीकडे वळायला तयार नाहीत. त्यांना शहरात जायचे आहे. पण शहरांना आकार-ऊकारच राहिलेला नाही. तीन वेळा शेतकरी कर्जमाफी झाली पण सर्वात जास्त आत्महत्यांचा आकडा महाराष्ट्रात आहे.

तुम्ही कोस्टल रोडची स्तुती करता पण तुमची वाट लावायला झाला आहे तो रस्ता. तो इतरांना आत येण्यासाठी व मराठी माणसाला बाहेर काढण्यासाठी तो रस्ता झाला आहे, अशा टीका केली. तामिळनाडू, केरळ अगदी शेजारचा गुजरात हे राज्य आपली भाषा टिकवून आहेत. मात्र, आपल्या आमदार-खासदार यांना फक्त कंत्राटदार आणि पैसेच दिसतात. यांनी महाराष्ट्र विकायला काढला आहे, असे राज म्हणाले.

इराणवरून मोदी सरकारवर नाराजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही गोष्टी राहून गेल्या. जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. काश्मिरच्या मुददयावर आपल्याला पाठिंबा देत आला, त्याच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो नाही. इराणवर आज हल्ले होत आहेत, आपण इराणला साथ दयायला पाहिजे होती. देशात येणारे बरेचसे तेल इराणमधून येत होते. ते आपल्याला रूपयात तेल देत आले. पण खामेनी गेल्यानंतरही पंतप्रधानांनी निषेधाचे एक वक्तव्य केले नाही, हल्ल्यावरही काही बोलले नाही. त्याचा त्रास भविष्यात आपल्याला होणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आपल्याकडे स्वदेशीचे तुणतुणे वाजवले जाते. पण ज्यावर देश चालतो ते तेलपण बाहेरून येते. बाहेरून पैसे आणण्यापेक्षा बाहेरचे मेंदू आणा, असेही राज म्हणाले.

Youth political awareness
Zilla Parishad politics : झेडपीच्या सत्तेबाहेर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी

मुंबई - रत्नागिरी ट्रेन रद्द करून ती दादर ते गोरखपूर सुरू केली

मुंबई ते रत्नागिरी ट्रेन रद्द करून ती दादर ते गोरखपूर सुरू केली, असे सांगतानाच बाहेरचे किती लोंढे आदळणार आहात, हे एकदा सरकारने सांगावे, असे थेट आव्हान राज यांनी सरकारला दिले. महाराष्ट्र जर देश असता तर आज आपली अर्थव्यवस्था तीसऱ्या क्रमाकांवर असती, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मग एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, कोट्यवधी रुपये महाराष्ट्रातून दिल्लीला जातात. अख्ख्या भारताचा 25 टक्के खर्च हा महाराष्ट्र उचलतो. मग महाराष्ट्रात कोणी यायचे आणि कोणी नाही यायचे याचा अधिकार महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, अशी थेट मागणीच त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news