राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-२०२४ अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्ह चे आयोजन दक्षिण मेट्रो एअरपोर्ट स्टेशनच्या सभागृहात करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, पेंच प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, असोसिएशनचे पदाधिकारी आशिष काळे व गिरीधर मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते. नवीन पर्यटन धोरण आणले आहे. यातून राज्यात 1 लाख कोटी गुंतवणूकीची व त्यासोबतच 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशांतर्गत चांगले रस्ते निर्माण करून पर्यटनाला चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाला निसर्गाची देण लाभली असून येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पर्यटन स्थळे, गडकिल्ले, पूरातन मंदिरे आणि वने व वन्य पशू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. गडकरी यांनी महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण आणल्याबद्दल महाजन यांचे अभिनंदन केले.