निर्मल वारीसाठी आवश्यक नियोजन करा: गिरीश महाजन

निर्मल वारीसाठी आवश्यक नियोजन करा: गिरीश महाजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यासाठीची कामे पारदर्शकता ठेवून वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराजमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

विविध संस्थांचा समावेश

विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी आयोजित निर्मलवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. महाजन म्हणाले, निर्मल वारी यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याबाबत आवाहन करावे.

पायाभूत सुविधा अखंडीत राहो

पंढरपूर शहरातील वीजपुरवठा अखंडित राहील, याची दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी आवश्यक असल्यास जनरेटरची सुविधा उपलब्ध करीन द्यावी. पावसाच्या पार्श्वभूमीवर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होईल, याकडे लक्ष द्यावे. यावर्षी पालखी सोहळ्यासाठी गतवर्षापेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. पंढरपूर येथे पालखीतळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात. जळगाव जिल्हा परिषदेने संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर पंढरपूरपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने वाढविण्यात आले आहेत. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकर्‍यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news