नागपूर: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, मुख्यमंत्री आपलाच व्हावा, असे स्वप्न अनेकांना पडत असताना आता मग तुम्ही विनिंग सीट गमावणार का ? एकेक आमदार महत्त्वाचा आहे, असा कळीचा मुद्दा उपस्थित करीत दक्षिण नागपुरातील काँग्रेस पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया येथून इच्छुक आहेत. 2019 साली प्रमोद मानमोडे यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांना चार हजार मते मिळाली. काँग्रेसचे गिरीश पांडव यांना भाजप आमदार मोहन मते यांच्या विरोधात 82 हजार मते मिळाली. 3800 मतांनी काँग्रेसचा पराभव झाला. मध्य आणि दक्षिण नागपूर थोडक्यात गेले. गेल्या पाच वर्षात सातत्याने आम्ही जनतेत आहोत, अशा वेळी ही जागा काँग्रेसनेच लढावी, ही जागा ठाकरे गटाला गेल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देणार असा इशारा दक्षिण नागपुरातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एका बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिला.
'सांगली पॅटर्न' होण्याची शक्यता या मतदारसंघात वर्तवली जात असताना आता मुंबईत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पूर्व नागपूर मतदार संघातही महाविकास आघाडीतील शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे. शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी आज (दि.१९) एक बैठक घेतली.
काँग्रेसच्या आम्ही केवळ सतरंज्या उचलत राहायचे का ?, राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीत शहर आणि ग्रामीण एक जागा हवीच आहे, अन्यथा आम्ही देखील काँग्रेसचे काम करणार नाही, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेना कधीकाळी भाजपसोबत महायुतीत असताना शहर आणि ग्रामीणमध्ये आम्हाला संधी दिली जात होती. पूर्व मध्य आणि दक्षिण नागपूरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. एकत्रित महाविकास आघाडीने शक्ती लावल्यास ही जागा आम्ही जिंकू शकतो, असा दावा ठाकरे गटातर्फे केला जात आहे.
एकंदरीत महाविकास आघाडीत नागपुरातील सहापैकी किमान एक -एक जागा मिळावी, यासाठी ठाकरे गट व राष्ट्रवादी पवार गट आग्रही असताना ग्रामीणमध्ये रामटेक, कामठीच्या जागेवर देखील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. शेवटच्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस यांना किती जागा राखण्यात यश मिळते, ते लवकरच कळणार आहे.
विदर्भातील बहुतांशी जागी काँग्रेसच लढेल, काँग्रेसने शहरातील एकही जागा सोडायची नाही, असा पवित्रा यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या माध्यमातून दिला आहे. शिवसेनेतर्फे अलीकडेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रमोद मानमोडे यांनी दक्षिण नागपुरात आपली दावेदारी उघड केली. खासदार संजय राऊत या जागेसाठी आग्रही असले, तरी त्यांना दक्षिण नागपूरची फारशी माहितीच नाही, असा दावा करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळणार, काँग्रेस जिंकू शकणारी जागा गमावणार नाही, असा दावा केला आहे.
शिवसेनेला दक्षिणच्या मोबदल्यात रामटेक दिले गेल्यास जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पुन्हा एकदा कोंडी होणार आहे. कारण, गेले अनेक दिवस ते या मतदारसंघातून तयारीत आहेत. ठाकरे गटातर्फे विशाल बरबटे यांनी देखील बरेच दिवस या मतदारसंघात जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे. माजी खासदार प्रकाश जाधव देखील उत्सुक आहेत. अर्थातच कुठली जागा कोणाला मिळणार यावर महाविकास आघाडीचे नागपूर जिल्ह्यातील यश अपयश अवलंबून असणार आहे. ग्रामीणमधील काँग्रेसची एकही जागा सोडण्यास माजी मंत्री सुनील केदार तयार नाहीत. ग्रामीण मधील सर्व सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा शब्द त्यांनी अलीकडेच कळमेश्वर येथील जाहीर सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना दिला आहे. अर्थातच उमेदवारी कोणाला मिळणार यावर हा सर्व खेळ अवलंबून असणार आहे.