

नागपूर - मागील काही दिवसांपुर्वी अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संस्थेला कोट्यवधीची जमीन कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी (दि.3) दोघेही कोराडी स्थित महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे एकत्रित आल्याचे चित्र पहायला मिळाले. आम्ही दोघेही एकाच आईची मुले असून राज्यातील जनता सुखी संपन्न होऊ दे असा आशीर्वाद आईकडे मागितला. या जागेच्या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जे काही आरोप केले ते त्यांच्याकडे असलेल्या माहितीवर केले असू शकतात. मात्र मी महालक्ष्मी जगदंबेच्या नावाने असलेल्या या जमिनीबाबत काहीही बोललो नाही. मला यात पडायचे नाही असे घुमजाव पटोले यांनी यानिमित्ताने यावेळी माध्यमांशी बोलताना केले.
एकंदरीत बावनकुळे यांना कोंडीत पकडणारे वडेट्टीवार तर दुसरीकडे त्यांच्यासोबत आम्ही दोघेही भाऊ-भाऊ आहोत असे म्हणणारे नाना पटोले यावरून दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. अश्विन नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी दरवर्षी मी कोराडीला येतो. कुलदैवत असल्याने वर्षांनुवर्षं आमच्या घरी ही परंपरा आहे. माझ्या नातीचे अन्नप्राशन असल्यामुळे आम्ही दोन्ही कुटुंब आम्ही एकत्रित आले असल्याचेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, राजकारण करण्याची ही जागा नाही, वेळही नाही. आम्ही दोघेही देवीच्या चरणी नतमस्तक झालो असे बावनकुळे व पटोले यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळू दे, स्वप्ने पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद मात्र या दोघांनी मागितल्याची कबुली दिली. अर्थातच आई जगदंबा हा आशीर्वाद नेमका कुठल्या भावाला देणार हे आता येणारा काळच सांगणार आहे.