नागपूर; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी असे धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. नागपुरातही चौकाचौकात उभे असलेले ४०० अवैध होर्डिंग नागपूरकरांसाठी यमदूत ठरु शकतात. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या होर्डिंगमुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. यासह रेल्वेने परवानगी दिलेले २०० होर्डिंगही जीवघेणे ठरू शकतात, यासाठी आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१७) मनपा आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरी यांच्याकडे या अवैध होर्डिंगबाबत तक्रार करत निवेदन दिले.
खासगी एजन्सीला लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वेनेही २०० पेक्षा जास्त होर्डिंगला परवानगी दिली असून यापैकी एकही होर्डिंग महाराष्ट्र शासनाने २०२२ मध्ये तयार केलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे नाहीत. मात्र, याचे कुठलेही संरचनात्मक स्थिरता ऑडिट करण्यात येत नाही. यापैकी अनेक होर्डिंग रेल्वे स्थानकांवर आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. वारा सुटल्यावर हे सर्व होर्डिंग हालतात. त्यामुळे कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.
होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकारने २०२२ मध्ये स्काय साईन आणि जाहिरातींच्या प्रदर्शनाचे नियमन आणि नियंत्रण नियमावली तयार केली. यानुसार जास्तीत जास्त ४० बाय ३० फुटांपर्यंत होर्डिंगला परवानगी आहे. मात्र शहरात आकारापेक्षा कितीतरी पटीने मोठे होर्डिंग चौकाचौकात उभे आहेत. एका स्ट्रक्चरवर फक्त एका होर्डिंगची परवानगी असताना याठिकाणी दोन ते तीन होर्डिंग लावण्यात आले आहेत. याशिवाय महानगरपालिका दर तीन वर्षांनी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट मागत असते. मुळात या होर्डिंगचे ऑडिट दर सहा महिन्यात करणे गरजेचे असल्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे. तसेच होर्डिंगचा आकार मोठा असल्याने वादळ-वारा सुटल्यास अपघाताची टांगती तलवार नागपूरकरांच्या डोक्यावर लटकत आहे. असेही आमदार विकास ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :