File Photo
File Photo

धानाला हिवाळी अधिवेशनात बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची सातत्याने मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच शासन काम करीत असून नागपूर हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२०) केली. 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदान, भंडारा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॅा.विजयकुमार गावित, खा.सुनील मेंढे, आ.नरेंद्र भोंडेकर, आ.राजु कारेमोरे, माजी मंत्री परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले, मधुकर कुकडे, माजी आमदार नानाभाऊ पंचबुद्धे, चरण वाघमारे, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलिस अधीक्षक लोहित मतानी आदी उपस्थित होते.

धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी केली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सद्या सुरु असलेली खरेदी केंद्रे पुरेशी नसल्याने उर्वरित केंद्र सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

सद्या शेतकऱ्यांच्या पिकांचा ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पिक पाहणीच्या कार्यक्रमास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
दरम्यान, ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचे प्रात्यक्षिक बघितले, स्वतः ड्रोन हाताळले. समृध्दी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येत असून या मार्गाच्या डीपीआरचे काम वेगात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news