शेफ नीता अंजनकर आशिया बुक ऑफ रेकॉर्डसने सन्मानित

नागपूर
नागपूर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : एकदा नव्हे दोनवेळा कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी, शुक्रवार (दि.28) 1 हजार किलो अंबील तयार केली. या उपक्रमाची दखल घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना या विक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र देत सन्मानित केले.

निता अंजनकर यांना 10 वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरच्या भयंकर आजाराने विळखा घातला होता . मात्र त्यांनी या आजारावर जिद्दीने मात केली. त्यानंतर पुन्हा त्यांना एक महिन्यापूर्वी फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. मात्र जिद्दीने त्यांनी या रोगाशी पुन्हा दोन हात करण्याचे ठरविले. नागपूर, हैदराबाद असे उपचार करतानाच त्यांनी या अफलातून विक्रमाची पूर्वतयारी सुरू केली. आज शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने आयोजित विदर्भाचा नंबर वन शेफ, पाककला स्पर्धा निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती झाली. एकंदरीत त्यांनी या रोगाला हसत-हसत सामोरे जात एक हजार किलोची अंबील तयार करण्याचा विक्रम करुन दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मिलेट्स वर्ष म्हणून जाहीर केल्याचेही निमित्त यात होते. ज्वारीसह इतर भरड धान्याची अंबील करण्याचा उपक्रम त्यांनी ठरवला . कर्करोगाशी झुंज देणाऱ्या कॅन्सर वॉरियर्ससाठी हा उपक्रम समर्पित केल्याचे निता अंजनकर यांनी सांगितले. रोग कितीही मोठा असला तरी आपण त्याला हसत-हसत पुढे जायला हवे, असा सबुरीचा सल्ला या निमित्ताने निता अंजनकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी देखील या आयोजनात उपस्थित राहून निता अंजनकर यांच्या या विक्रमाचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर, विनोद अंभोरे, निखिलेश आणि भूमी सावरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news