

नागपूर : राज्याच्या महसूल प्रशासनात मोठा बदल घडवत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. यापुढे कोणत्याही स्वागत समारंभासाठी विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहू नये, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला. या निर्णयामुळे महसूल अधिकाऱ्यांचा अमूल्य वेळ प्रोटोकॉल आणि स्वागत समारंभात वाया जाणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनातील वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. "महसूल अधिकाऱ्यांचा वेळ प्रोटोकॉलमध्ये खर्च होतो, त्यामुळे आता स्वागतासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊ नये," असे त्यांनी जाहीर केले. या नव्या दिशानिर्देशामुळे महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्य कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, तसेच प्रशासनातील अनावश्यक औपचारिकता कमी होईल, अशी प्रतिक्रिया उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूढे तहसील कार्यालय ते मंत्रालय असा होणारा फाईलचा वेळखाऊ प्रवास कमी करणार असल्याचे भाष्य केले आहे. गतिमान प्रशासनासाठी फाईलींच्या प्रवासाचे टप्पे कमी करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.