

चंद्रपूर महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही
महापौरपदावरून काँग्रेस व भाजपमध्ये तीव्र रस्सीखेच
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची उद्धव ठाकरेंशी मातोश्रीवर भेट
शिवसेना, वंचित व अपक्ष नगरसेवकांचा ‘महापौर आमचाच’ असा पवित्रा
वडेट्टीवारांचा दावा – चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचाच होणार
नागपूर :
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूर महापालिकेतील शिवसेनेचे सहा नगरसेवक तसेच वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचे दोन अपक्ष नगरसेवक अशा गटाने याआधी ऍड. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. महापौर आमच्या गटाचा होणार असेल, तरच काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देऊ, असा ठाम पवित्रा या गटाने घेतला आहे.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्यात सुमारे ३० मिनिटे चर्चा झाली. मात्र या चर्चेत नेमके काय ठरले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे भाजपकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, नागपुरात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र गटासंदर्भात वडेट्टीवार गटाने नोंदवलेल्या आक्षेपांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विचारले असता विजय वडेट्टीवार यांनी “नो कॉमेंट्स” असे म्हणत अधिक बोलणे टाळले. मात्र चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचाच होणार, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.