

Kolhapur News |
कासारवाडी : जोतिबाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची महिंद्रा पिकअप सादळे-मादळे (ता. करवीर) घाटातील दुसऱ्या वळणावर पलटी झाली. रविवारी सादळेकडून कासारवाडीमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावर जाताना हा अपघात झाला. यात चालकासह तिघेजण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील चौघेजण शनिवारी रात्री जोतिबाच्या दर्शनासाठी महिंद्रा पिकप घेऊन आले होते. रविवारी सकाळी जोतिबाचे दर्शन घेऊन मंगळवेढ्याकडे परत जाताना सादळे-मादळे येथील घाटातील जुने जिनिसेस कॉलेजच्या वळणावर यु आकाराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी पलटी होऊन बाजूच्या कंपाऊंडवर अडकली. यातील चालकासह तिघेजण जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक प्रवाशांनी व पर्यटकांनी गाडीतून जखमींना बाहेर काढले.
मागील दोन वर्षात घाटातील या वळणावर अनेक अपघात झाले आहेत. ट्रॅक्टर चालक, दुचाकी स्वारांनी आपला जीव गमावला आहे.
घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. येथील घाट रस्त्यावर सुरक्षा कठड्यांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. प्रशासनाला अजून किती जणांचे जीव हवे आहेत, असा प्रश्न वाहनचालकांमधून उपस्थित होत आहे.