

नागपूर - केंद्रातील मोदी सरकारची ‘11 साल बेमिसाल' कार्यक्रम घेऊन भाजपने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. काँग्रेसने संविधानाची कशी पायमल्ली केली हे जनतेत सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकंदरीत लोकसभेला काँग्रेसला फायदा झाला आता भाजपने संविधानाच्या मुद्यावर विशेष भर दिला आहे. येत्या २५ जूनला आणीबाणीचे स्मरण करून देतानाच संविधानाची पायमल्ली कोणी केली, याविषयीची पत्रके घरोघरी वाटप केली जाणार आहेत. संविधानाची पुस्तके हाती घेऊन मिरवणाऱ्यांनीच संविधानाचा कसा अनादर केला हे लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहे.
मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात केलेल्या सुधारणा, या दरम्यान झालेला देशाचा विकास, शक्तीशाली देश म्हणून मिळालेली ओळख आणि गोरगरिबांना दिलेल्या सुविधांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी १२ जून ते २५ जून अशी विविध कार्यक्रमांची आखणी भाजपने केली आहे. या दरम्यान नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदार संघातील २० मंडळात १० जनसंवाद सभा, त्यानंतर २० मोठ्या सभा घेण्यात येणार आहेत.
या सभांमधून केंद्र, राज्य आणि महापालिकेने लोकांच्या सविधेसाठी काय काय निर्णय घेतले, त्याचे काय फायदे झाले हे सांगण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आर्थिक क्षेत्रातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी चार्टड अकाऊंटंट, फायनान्स क्षेत्रातील कन्सटंट यांचे संमेलन, शिक्षकांचे संमेलन, नवउद्योजक संमेलन घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समाज कल्याण संदर्भातील सर्व योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी २० मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामामार्फत सेतू केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा आता महापालिकेच्या झोन स्तरावर देण्यात येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
आणीबाणीचा विरोध करताना मिसाबंदी कायद्याखाली अटक झालेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. आणीबाणीमुळे उध्वस्थ झालेली कुटुंब, त्यावेळी देशात निर्माण झालेली अस्थिरत आणि नुकसान याची माहिती देण्यासाठी एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोबतच संविधानाची पायमल्ली कोणी याची माहिती देणारी पत्रके वाटून संविधानाचे मारेकरी कोण हा संदेश घरोघरी पोहचविला जाणार आहे. हातात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरणाऱ्यांनीच कसा संविधनाचा अपमान केला हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, माजी खासदार अजेय संचेती, शहर महिला अध्यक्ष प्रगती पाटील, चेतना टांक, अश्विनी जिचकार, संदीप जाधव, संदीप गवई आदी उपस्थित होते.