मंचर: पुढील काही महिन्यांत नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी तयारीला लागावे. काम केले नाही, तर तुमचा कान पकडण्याचा अधिकार देखील मला आहे. कार्यकर्त्यांनी स्वत:ऐवजी पक्षसंघटनेला महत्त्व देऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले.
मंचर-निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे आयोजित संघटनात्मक दौरा कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कंद बोलत होते. (Latest Pune News)
या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, पक्षासाठी काम करणार्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी मी केव्हाही तयार आहे. आपल्या पक्षाचे आचार-विचार, संस्कार चांगले आहेत. कोण काय विचार करतो, याकडे लक्ष न देता पक्षासाठी काम करा.
पक्षाचे नुकसान होईल असे काम करू नका, पक्षाच्या सदस्यवाढीसाठी प्रयत्न करा, येणार्या निवडणुकांसाठी प्रत्येक मंडलाध्यक्षाने काम करावे, कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील, परिसरातील प्रश्न समजावून घ्यावेत; ते प्रश्न तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्न करा. पक्षात तालुकापातळीवर पक्षात एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, तर ते बाजूला ठेवा. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा. मंडलाध्यक्ष, बूथप्रमुखांनी एकत्र येत सामोपचाराने प्रश्न सोडवावेत.
या वेळी भाजप संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे म्हणाले की, पक्षाने दिलेल्या आदेशानुसार तालुक्यात काम करून जी कामे आम्हाला होणार नाही, ती जिल्हाध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू. भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपली ताकद मिळावी, यासाठी प्रयत्न करावा. यापूर्वी भाजप पक्षाचे अनेक जिल्हाध्यक्ष होऊन गेले.
मात्र, प्रदीप कंद यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. यापुढील निवडणुका ताकदीने लढू. यापूर्वी आंबेगाव तालुक्यात कमळाने आपले नाव कोरले नाही. मात्र, येणार्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत कमळाचे चिन्ह कोरल्याशिवाय राहणार नाही. स्वागत अशोक गभाले यांनी केले. प्रास्ताविक किरण वाळुंज यांनी केले. जयसिंग एरंडे यांनी आभार मानले.