

नवी दिल्ली : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाचीही चर्चा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चा थांबल्या होत्या मात्र पुन्हा एकदा दिल्लीतील राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ झाल्यापासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पदासाठी विविध नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह काही प्रमुख नावे आहेत. दरम्यान, सध्या ही तिन्ही प्रमुख व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळात आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमित शाह यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते केंद्र सरकारमध्ये मंत्री झाले मात्र संघटनेमध्ये अजूनही अमित शाह यांचा दबदबा आहे. त्यामुळे भूपेंद्र यादव यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तरेतून येत असलेले भूपेंद्र यादव बिहार भाजपचे प्रभारीही राहिले आहेत. बिहारमध्ये यादव समाजाची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे भाजप त्यांच्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील नेते आहेत. सध्या केंद्रात मंत्री असून प्रधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. धर्मेंद्र प्रधान यांचेही वडील भाजपचे दिग्गज नेते राहिले आहेत. वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मेंद्र प्रधान यांच्या नावासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान हे देखील महत्वाचे नेते आहेत. प्रधान यांचा कुर्मी समाज बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांचाही विचार भाजपमध्ये होऊ शकतो.
भाजपामध्ये संघटनात्मक निवडणुका सुरू असून लवकरच राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम भाजपद्वारे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्यात भाजपला नवे अध्यक्ष मिळू शकतात, असे मानले जाते.