

मृणालिनी नानिवडेकर
नागपूर : महाराष्ट्रातील प्रत्येक महापालिका निवडणूक युतीने लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जागावाटप चर्चेला प्रारंभ होणार आहे. येत्या मंगळवारी तारीख 16 रोजी महानगरपालिकांच्या शहरांमध्ये दोन्ही पक्षांचे नेते परस्परांशी चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. निवडणूक घोषणा आणि प्रत्यक्ष मतदान यात जेमतेम 30 दिवसांचा कालावधी असल्याने चर्चा वेगाने सुरू होतील. स्थानिक पातळीवर चर्चेची पहिली फेरी मंगळवारी होणार आहे आणि दोन ते तीन दिवसांत जगावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी युती हा आपला धर्म असून शिवसेना हा समविचारी हिंदुत्ववादी पक्ष असल्याने एकनाथ शिंदे यांना समवेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे भारतीय जनता पक्षातील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी पडणार असले तरी युतीने 29 ही महानगरपालिकेला एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उद्योग मंत्री शिवसेना नेते उदय सामंत यांच्यात प्रारंभिक चर्चा पार पडली आहे.
रविवार दिनांक 14 रोजी अधिवेशन समाप्त होताच 15 डिसेंबर रोजी संध्याकाळनंतर केव्हाही निवडणुकांची घोषणा होईल.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर रोजी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना परस्परांशी चर्चा करेल. मुंबई महानगरपालिकेबद्दल शिवसेना आणि भाजपतील चर्चेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मुंबई चे अध्यक्ष अमित साटम ज्येष्ठ नेते अतुल भातखळकर आणि माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे भारतीय जनता पक्षातर्फे तर शिवसेना शिंदे गटातर्फे उद्योग मंत्री उदय सामंत माजी खासदार राहुल शेवाळे प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे परस्परांची भेट घेतील. या बैठकीमध्ये परस्परांना हव्या असलेल्या जागा आणि तेथे हवे असलेले उमेदवार याबद्दल प्रारंभिक चर्चा होईल. शिवसेना शिंदे गटाने प्रारंभापासूनच मुंबई महानगरपालिकेत अर्धा वाटा किंवा किमान 110 जागा आम्हाला लढण्यास द्या, अशी मागणी केलेली आहे, मात्र भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत काही नेत्यांनी भाजप 97 साली ज्या परिस्थितीत होती त्या परिस्थितीत शिंदे सेना असून त्यांना 60 फार तर 80 जागा द्याव्यात, असा प्रस्ताव ठेवला आहे.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांच्या मतानुसार होईल असे सांगितले होते परंतु भाजपचे केंद्रातील धोरण मित्रपक्षांना बरोबर घेऊन जायचे असल्याचे आता फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी शिव प्रकाशजी यांनीही या संदर्भात पक्षातील कार्यकर्त्यांना सध्या एकत्वाने पुढे जाऊया असे सांगितले आहे. जागावाटप चर्चेनंतर बंडखोरी होणार नाही याचीही काळजी आहे.स्थानिक मंत्र्यांना नेत्यांना तसेच आमदारांना ही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
युती बाबत दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यांची एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचा दावा दोन्ही पक्षांतर्फे केला जातो आहे. नाशिक महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला किमान 50 जागा हव्या आहेत.तेथे आमचा पक्ष वाढत असून आमदारांची ताकद मोठी असल्याचे शिंदेसेनेने सांगितले आहे.
नागपूर या महानगरपालिकेत शिंदे गटाचे फारसे अस्तित्व नसले तरी तेथे देखील वीस जागा मागितल्या जाण्याची शक्यता आहे प्रत्येक ठिकाणी त्या त्या पक्षाची ताकद पाहून जागा दिल्या जातील असे धोरण आधीच लक्षात घेतले गेले आहे भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी पुणे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाशी युती केली जाईल काय हे शक्यता चाचपडून पाहिली जाईल असेही स्पष्ट केले मात्र या भूमिकेबाबत नक्की काय पावले टाकली जातील याबद्दल अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उद्या तारीख 14 रोजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रेशीमबाग या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानावर भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांचे आमदार एकत्रितरित्या जाणार आहेत अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा सदस्य असला तरी ते या ठिकाणी जाणार नाही, असे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.
शिवसेना शिंदे गटाला पुणे, पिंपरी- चिंचवड या भागात विशेष रस नाही. त्यांना कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे या परिसरात रस आहे. मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे-डोंबिवली या परिसरात जागावाटप कठीण होईल;परंतु हे मुद्दे सामोपचाराने सोडवले जातील, अशी माहिती शिंदे यांनी स्वतः दिली.
मुंबईत महायुतीचाच महापौर : मुख्यमंत्री
मुंबईत महायुतीचाच... महायुतीचाच... महायुतीचाच महापौर होणार, असे तीन वेळा निक्षून सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा महायुती अभेद्य असल्याचे नागपुरात स्पष्ट केले.