

प्रवीण सोनावणे
ठाणे : मुंबई महापालिकेनंतर ठाण्यातही भाजप शिवसेनेची युती होणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे. युती संदर्भात वरिष्ठ पातळीवरूनच संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यात प्रभाव वाढूनही युतीमुळे भाजप पक्षाची परवड होणार आहे. शिवसेनेकडे सध्या 79 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने एकूण जागांच्या तुलनेत हे संख्याबळ जवळपास 75 टक्के आहे. तर भाजपकडे 24 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने या 106 जागा वगळून उर्वरित 23 जागांवर दोन्ही पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची चिन्हे आहेत. जुने ठाणे, घोडबंदर अशा ठिकाणी भाजपचे प्राबल्य असतानाही केवळ युतीमुळे या ठिकाणी भाजपला माघार घ्यावी लागणार असून यामुळे भाजपच्या गोटामध्ये मात्र अस्वस्थता आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या काही वर्षात ठाण्यात भाजपचे प्राबल्य बऱ्यापैकी वाढले आहे. ठाणे आता मोठ्या प्रमाणात विस्तारले असून शहरात आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. परिणामी, या ठिकाणी राहायला आलेला मतदार हा केवळ मराठी मतदार नसून वेगवेगळ्या धर्माचा मतदार आहे. घोडबंदर पट्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या उच्चभ्रू इमारतींमध्ये भाजपची मोठी वोटबँक आहे. गेल्या काही वर्षात ठाण्यात आणि विशेष करून घोडबंदर पट्यात पक्षवाढीसाठी भाजपकडून चांगले प्रयन्त झाले असले तरी, आता ठाण्यात युती होणार हे जवळपास निश्चित झाल्याने यामुळे ताकद वाढूनही भाजपला याचा फटका बसण्याची चिन्हे अधिक आहेत.
शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या 79 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मध्यतंरीच्या काळात शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळव्यातील सहा नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी करत या सर्व नगरसेवकांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे. लोकमान्य नगर परिसरातही ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी देखील शिवसेनेची ताकद वाढली आहे. उबाठा पक्षात माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे तसेच घोडबंदर पट्यातील नरेश मणेरा वगळता एकही नगरसेवक उबाठाकडे नाही. नरेश मणेरा यांच्याबाबतही वेगळ्या पद्धतीच्या चर्चा असल्याने उबाठा आपले खाते उघडेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस आणि मनसेची परिस्थिती फारशी व्यवस्थित नसल्याने खरी लढत ही शिवसेना आणि भाजपमध्येच होणार होती. मात्र आता युतीच्या चर्चांनी ही लढत आता संपुष्टात आली असून यामुळे भाजपलाच खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत करावी लागणार आहे.