

Nana Patole on BJP internal rebellion
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिका मनपा तिकीट वाटपातील महायुतीतील बंडखोरी, वाढता असंतोष राज्यातील जनतेने बघितला आहे. भाजपमध्ये अजून खूप उद्रेक होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातही उद्रेक होणार आहे. भाजपच्या राज्य पातळीवर देखील खूप काही चालले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांना लॉलीपॉप देऊन त्यांना समजावतील, पण महापालिका निवडणुकीनंतर भाजपमध्येही मोठे बंड होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि. १ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केला.
पटोले म्हणाले, भाजप जाणीवपूर्वक हिंदी, मराठी प्रश्न उपस्थित करून वाद निर्माण करीत आहे. यापेक्षा त्यांनी जनतेत जावे. अकरा वर्षांत या जनतेसाठी सरकारने काय केले ते सांगावे, लोकांवर किती कर्ज वाढले आणि किती भ्रष्टाचार केला ते त्यांनी सांगावे, असे आव्हान पटोले यांनी दिले.
मुंबई महापौर पदाचा वाद करण्यापेक्षा मुंबई कशी विकली आणि महाराष्ट्राला महागाईच्या आगीत झोकले. पेट्रोल-डिझेलमध्ये केंद्र आणि राज्य सरकार पैसे घेत असल्याने शंभरी पार झाली. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. गेले पाच वर्षे महाराष्ट्रात या निवडणुका झाल्या नाहीत. या महानगरपालिकांवर पुन्हा कर्जाचा भार पडणार आहे. महाराष्ट्रात महायुती केवळ सत्तेसाठी एकत्र आहे. सर्वत्र सत्ता कशी येईल त्यासाठी एकत्र आलेले आहेत. यांना राज्याशी काही देणेघेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.
चंद्रपूरमधील मी त्या प्रक्रियेत नव्हतो. त्यामुळे मला माहिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्या भागातील कार्यकर्ते निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल. भाजप आणि भाजपसोबत असलेल्यांना सोडून आम्ही आमची जी भूमिका असते ती आजही कायम आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. जनतेच्या मताचा अधिकार राहू दिला तरच खऱ्या अर्थाने आपली लोकशाही अजून बलाढ्य होईल, शक्तिशाली होईल आणि देश बलाढ्य होईल. काँग्रेसचा पराजय झाला नाही, तर भाजपच्या बेईमानीने केलेला हा पराभव होता, असेही ते म्हणाले.
भाजपवाले राहुल गांधी यांना खूप घाबरतात. मी सांगितले, देशातील शोषित, पीडित लोक, शेतकऱ्यांसाठी आणि देशातील संविधान वाचवण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी हे अयोध्येला जातील तेव्हा ते अवश्य दर्शन घेतील. जनकल्याणासाठी भगवान श्रीरामाच्या पावलावर राहुल गांधी काम करत आहेत, हे मी म्हटलं होतं. मी भगवान श्रीराम आणि राहुल गांधी अशी तुलना केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला छोटे दाखवित स्वतःला मोठे दाखवले. मग ते रामभक्त आहेत का, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.