

नागपूर : राज्यातील अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे उभा ठाकलेला संकटाचा डोंगर ओलांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवणे, नुकसानग्रस्तांना न्याय देणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य देणार राहील. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कालपर्यंत १७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल. शेतकऱ्यांना तातडीची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून वाटप सुरू झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था (एनजीओ) आणि व्यावसायिकही मदतीसाठी पुढे येत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
सोयाबीन पिकांचेही पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्या आमदारांनी एक महिन्याचे मानधन मदतनिधीस देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांचे वेतन दिले याकडे लक्ष वेधले असता सर्व आमदार श्रीमंत नसल्याचा टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार केला जाईल.
अकोला येथील मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे जर ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर हा मोठा गुन्हा आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना महसूल विभागात जागा नाही. मंडळ अधिकाऱ्याच्या वर्तनाबाबत विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून, शेतकऱ्यांचे नुकसान हेकेखोरपणामुळे झाले असल्यास फौजदारी कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, नागपूर किंवा अमरावतीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. त्याचे पंचनामे आम्ही करणार आहोत. शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठविला जाईल. केंद्र सरकारकडूनही मदत मिळेल,” असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
आदिवासी समाजासाठी सरकारने पुढाकार घेतला असून पडीत जमिनी सौर प्रकल्पासाठी भाड्यावर देण्याची योजना आहे. जमिनी आदिवासींच्याच नावावर राहतील. करार जिल्हाधिकाऱ्यांसमोर होईल. एकरी ५० हजार रुपयांपर्यंत थेट फायदा मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू झाले असून, हे २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत चालेल. या अभियानातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकरी, शेतमजूर आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवल्या जातील. पांदन रस्त्यांना क्रमांक देणे, सर्वांसाठी घरे योजनेत पट्टे वाटप, तसेच जीएसटीमधील सवलतींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.