

Nagpur News
नागपूर - शेतकऱ्यांना नैसर्गिक नुकसानीची मदत ही तीन हेक्टरपर्यत देण्यात येते. परंतु यातही कपात करुन ही मदत दोन हेक्टरपर्यत देण्याचा निर्णय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. हा निर्णय झाला तर आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत येईल. यामुळे या मदतीत कपात करु नये अशी मागणी करणारे पत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
शेती पिकाचे नैसर्गिक नुकसान झाल्यास राज्य सरकारच्या मार्फत पंचनामे करुन तीन हेक्टरपर्यत प्रति हेक्टर 36 हजार रुपये बागायतीसाठी तर प्रति हेक्टर 16 हजार रुपये जिरायतीसाठी नुकसान भरपाई म्हणुन मदत शेतकऱ्यांना देण्यात येते. परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार या मदतीमध्ये कपात करुन ही मदत दोन हेक्टरपर्यत देण्याचा शासन निर्णय करणार आहे. या निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्याकारक होईल. दुसरीकडे बाजारात शेतकरी जो शेतमाल विक्रीसाठी आणतो त्याला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे. अशातच जर नुकसान भरपाईमध्ये कपात केली तर त्याचा फटका हा शेतकऱ्यांनाच बसेल याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
नरखेड तालुक्यातील मोगरा, टोळापार, धोत्रा, मोहदी या गावात वादळी वाऱ्याने नुकसान झाले. या भागाची अनिल देशमुख यांनी पाहणी केली. शेतातील संत्राची झाडे पडली असून घराचे व गोठयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, काटोल व तहसीलदार नरखेड यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच या नुकसानीचा अहवाल हा जिल्हाधिकारी, नागपूर यांच्यामार्फेत शासनाला सादर करण्यात येणार आहे. या नुकसानग्रस्तांना सुध्दा तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.