

Revenue Department Action
नागपूर: नोंदणी अधिनियम स्पष्ट असून त्यात गडबड करणाऱ्या मुद्रांक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.८) स्पष्ट केले. पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी सुरू असून महिनाभरात अहवाल सादर होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, नोंदणी व्यवहारातील अधिनियम स्पष्ट असून गडबड करणाऱ्या मुद्रांक अधिकाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याची सरकारची भूमिका आहे.
प्रताप सरनाईक जमीन प्रकरणी तक्रार मिळाल्यास चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. ४२ कोटी शुल्क प्रकरणी सकृतदर्शनी गडबड आढळल्यानंतर प्राथमिक कारवाई झाली असून अंतिम निर्णय चौकशी अहवालानुसार होणार आहे. महसूल आणि नोंदणी खात्यात काही गडबड वाटल्यास नागरिकांनी मुक्तपणे तक्रार करावी, सरकार ऐकायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक युतीबाबत बोलताना त्यांनी महायुतीतच लढण्याचा निर्णय कायम असल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलीस भरती प्रकरणी विद्यार्थ्यांच्या मागण्या डीजींकडे पाठवल्याचे सांगत लवकरच मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली. मेळघाट, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी दौऱ्यात शेतकऱ्यांना वितरित होणाऱ्या ५५० कोटींच्या मदतीचा मदतीचा आढावा घेतला जाईल.
कर्जमाफी संदर्भात शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मदतनिधीपैकी ९,००० कोटींपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती त्यांनी दिली.