Koradi Temple Gate Collapse| कोराडी मंदिर दुर्घटनेप्रकरणी दोषी कंत्राटदारावर कारवाई होणार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी देवस्थान येथे सुरू असलेल्या निर्माणधीन भव्य प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याची घटना शनिवारी (दि.९) रात्री घडली. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून महिनाभरात सदर कंत्राटदार कंपनी, काम करणारी कंपनी, एन एमआरडीए यांच्या जबाबदारीत कुठे कुणाची चूक झाली, व्हिएनआयटीचे निकष पाळले गेले की नाही याविषयीचा सविस्तर अहवाल मागितला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि.१०) माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मंदिर व्यवस्थापनाचा बांधकामाशी संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत मलब्याखाली दबलेल्या सर्व मजूरांना सुखरूप बाहेर काढले. यातील पाच मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना देवस्थान समिती व संबंधित कंपनीतर्फे मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री बावनकुळे बुलडाणा, अकोला जिल्हा दौऱ्यावर असल्याने जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. दोषी कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे 'एनएमआरडीए' आयुक्त संजय मीना यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले.

