

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना आणि शरण पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आणि शेतकरी मेळाव्या'त शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे," असे प्रतिपादन केले. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांना शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध करून देण्याच्या शरण पाटील फाऊंडेशनच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यालयाला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी वाहून घेतल्यानेच इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.
या मेळाव्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचे काही महत्त्वाचे मुद्देही मांडण्यात आले. मराठवाड्याचा विकासानुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवणे, बंद पडलेले तेरणा व तुळजाभवानी सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, मराठवाडा संघटनमंत्री संजय कोळगे, माजी मंत्री बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास गुरगुरे यांनी केले, तर दिलीप भालेराव यांनी आभार मानले. शरण पाटील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
उमरगा- लोहारा तालुक्यातील शेत रस्ता , पाणंद रस्ता करण्यासाठी लोकसहभाग म्हणून ५०००० रु हे शरण पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येत आहे तर सरकारच्या वतीने देण्यात येणारे १५०००० रु हे शेत रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी कमी पडत असल्याने यात आणखी निधी उपलब्ध करून देता आले तर शेतकऱ्यांना मदत होईल अशी मागणी शरण पाटील यांनी केली
मराठवाड्यातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून धाराशिव जिल्हा आहे त्याचे अनुषेश भरून काढण्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे तसेच जिल्ह्यातील तेरणा व तुळजा भवानी हे दोन सहकारी कारखाने चालू करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे तर त्याच बरोबर शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे
बसवराज पाटील (जिल्हाध्यक्ष लातूर ग्रामीण )