

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसात राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघावर आत्राम यांनी कधीकाळी दावा केला होता. या मतदारसंघात त्यांनी भाजप महायुतीच्या उमेदवारांना लीड न दिल्यास त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याने ते माझ्याबाबत बेछूट विधाने करत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा केला आहे.
'दोन दिवसापूर्वी वडेट्टीवार लवकरच भाजपात जाणार,' असे वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केले होते. आज त्यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. स्वतःच्या मुलीला (Shivani Vadettiwar) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत. दहा दिवस दिल्लीत मुक्कामी होते. यावरून त्यांचे काँग्रेसमध्ये किती महत्त्व कमी झाले आहे हे लक्षात येते, असा आरोप आत्राम यांनी केला. यावर वडेट्टीवर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजे असले तरी आपणही वाघ आहोत. आपण कुणाला घाबरत नाही, कुणाच्या दडपणाखाली काम करू शकत नाही, भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. अहेरी मतदार संघात काँग्रेसला ३० हजारांनी लीड मिळणार असल्याने ते माझ्यावर आरोप करीत असल्याचे टीकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडले. मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे लक्ष द्यावे. दुसऱ्या पक्षात लक्ष देण्याची त्यांना गरज नाही, असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला आहे.
हेही वाचा :