नागपूर विभागातील चार लोकसभा मतदारसंघात ७५ उमेदवारी अर्ज वैध | पुढारी

नागपूर विभागातील चार लोकसभा मतदारसंघात ७५ उमेदवारी अर्ज वैध

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभागातील चार लोकसभा मतदासंघात आज (दि.२८) छाननीमध्ये एकूण ७५ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. शनिवार ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. गडचिरोली मतदारसंघात सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले.

विभागात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून ५४ पैकी २६ उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले. २७ अर्ज अवैध ठरले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून २२ उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले. त्यापैकी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे ३ अर्ज, नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्ष्यांच्या उमेदवारांचे ४ अर्ज तर १५ अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. या लोकसभा मतदारसंघात ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गडचिरोली-चिमूर मतदार संघातील नामनिर्देशनपत्रांच्या छाननीत या मतदारसंघात दाखल संपूर्ण १२ अर्ज वैध ठरले. यात ए.बी. फॉर्म नसलेल्या दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरवले आहेत.

दरम्यान,चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशनपत्र छाननीनंतर १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघात एकूण ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी शनिवार ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button