भंडारा-गोंदियात अपक्ष उमेदवारांची गर्दी! २२ उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अवैध  | पुढारी

भंडारा-गोंदियात अपक्ष उमेदवारांची गर्दी! २२ उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अवैध 

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : भंडारा-गोंदिया सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २७ मार्च) नामनिर्देशन पत्राच्या अंतिम तारखेला उशिरापर्यंत ४० उमेदवारांनी ४९ नामांकन अर्ज दाखल केले. दरम्यान, आज, छाननी प्रक्रीया पार पडली असता १५ अपक्ष उमेदवारांसह २२ उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले आहे. एकंदरीत अपक्ष उमेदवारांची आकडेवारी पाहता सद्यातरी अपक्षांची गर्दी दिसून येत असून ही गर्दी राजकिय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे.
बुधवार २७ मार्च रोजी नामनिर्देशन पत्राच्या अंतिम तारखेला ३४ उमेदवारांनी ४० नामांकन अर्ज दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असताना ४० उमेदवारांनी एकूण ४९ नामांकन अर्ज दाखल केले. दरम्यान, आज (ता.२८) जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या कक्षात निवडणुक निरीक्षक विनय सिंग यांच्या उपस्थितीत नामांकन अर्जांची छाननी करण्यात आली. ज्यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे ३ अर्ज तर नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांचे ४ अर्ज वैध ठरले असतानाच १५ अपक्ष उमेदवारांचे अर्जही वैध ठरले आहेत. त्यातच छानणीत १८ उमेदवारांचे अर्ज नियमानुसार अवैध ठरले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्च रोजी असून या रणांगणात किती उमेदवार तटस्थ राहणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, वैध ठरलेल्या २२ अर्जांपैकी १५ अर्ज अपक्ष उमेदवारांचे असून हे उमेदवार कायम राहिल्यास १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजकीय पक्षाच्या विशेषतः थेट लढत होत असलेल्या उमेदवारांचे टेंशन वाढविणारे ठरणार आहेत.

Back to top button